स्वातंत्र्य मनाने जपायचं असतं अन् सद्भावना जगत मुक्ती जगायची असते.


हवे हवे आणखी हवे, हा स्वार्थ तोडायचा असतो अन् यावर माझा अधिकार नाही, म्हणून मला नको, हा व्यवहार जगायचा असतो.


अन हे समजून सांगणारे ज्ञान मिळविण्यासाठी, ही *एक कथा....*


ज्ञान केवळ शाळा कॉलेजातच मिळते असे नाही. आपले डोळे आणि मन उघडे असेल तर ज्ञान सगळीकडे उपलब्ध आहे.


किचन मधील नळ गळत होता म्हणून मी प्लंबरला बोलावले. तो काम करताना मी पहात होतो. त्याने आपल्या पिशवीतून पाईप पाना काढला, मी पाहिले तो तुटलेला होता. हा याने कसं काय काम करणार ? पण त्याने पाईप मधून नळ वेगळा केला. पाईप आतून भरला होता, त्यामुळे तेवढा भाग कापून टाकणे आवश्यक होते. त्याने परत आपल्या पिशवीतून हॅक्साॅ ब्लेड काढली. ती सुद्धा अर्धी तुटलेलीच होती. 


ती पाहून माझ्या मनात आले की, याच्याकडे साधी हत्यारेही ठीक नाहीत, हा कसे काय काम पूर्ण करणार ? मी कसल्या प्लंबरला बोलावलंय ? 

*(मी मनाने बद्द होता, तो स्वतंत्र होता.)*


 पण तो त्याच्या कामात बराच हुशार असावा, मघाशी त्याने तुटक्या पान्याने नळ खोलला आणि आता अर्ध्या ब्लेडने पाईप कापून खराब पाईप काढून थ्रेडही बनवले आणि पुन्हा नळ बसवून दिला. साधारण दहा-बारा मिनिटांतच त्याने काम उरकले. 


मी त्याला दोनशे रुपयांची नोट दिली. तो म्हणाला, माझ्या कामाचे एवढे पैसे होत नाहीत, तुम्ही मला पन्नास रुपये सुट्टे द्या. 


मी म्हणालो, सकाळी सकाळी मी बोलावले आणि लगेच तू आलास.  कामही केलेस. ठेव सगळे.


त्यावर तो म्हणाला, नाही साहेब, प्रत्येक कामाचा मोबदला मी ठरवलेला आहे, त्यापेक्षा जास्त घेणे माझ्या मनाला पटत नाही. आज तुम्ही मला जास्त पैसे दिलेत, तर मला आनंद होईल, पण त्याच बरोबर जास्त पैसे घेण्याची हावही मनात निर्माण होईल. सर्वच लोक मला जास्त पैसे देतील का ? जास्त पैसे मिळाले नाहीत तर मग मनात दु:ख होणेही सुरू होईल !

*(हे मनाचे संस्कार आपल्यावर झालेले नाहीत. आपण म्हणतो, मी संस्कारी अन शिकलेलो आहे)*


मी म्हणालो, 'हे पैसे घे, आणि तुटके सामान नविन घे. त्यामुळे तुझा त्रास कमी होऊन कामही लवकर होईल.

*(आपण आपल्या अहं-भावात हे सांगत असतो अन दहा ठिकाणी त्याचे कौतुक करत मोठेपणा मिरवत असतो.)*


तो म्हणाला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण काम करताना नवीन हत्यारे ही तुटणारच, ती त्यांची कामे करीत आहेत ना ! काम चांगले आणि लवकर करणे हे हत्यारांपेक्षा जास्त तुमच्या स्कीलवर अवलंबून असते,असे मला वाटते.


तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना कुठल्या कंपनीचे पेन वापरता हे महत्त्वाचे आहे की तुम्हाला योग्य लिहिता येणे आवश्यक आहे ? 


योग्य लिहिणे माहिती नसेल तर जगातील सर्वात महाग पेनही तुमचे काम योग्य करू शकणार नाही, खरे ना ? 


कौशल्य तुमच्या हातात असते मशीनमध्ये नाही.


मी नवीन हत्यारे आणली तरी तीही पुन्हा त्याच ठिकाणी तुटणार, आता एकदा तुटलीत, पुन्हा तुटणार नाहीत.


मी शांतपणे ऐकत होतो. त्या रोजंदारीवर मेहनत करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरील आनंद मला चकीत करून गेला.


आपण यांच्यापेक्षा किती तरी जास्त कमावतो तरी कुठूनही थोडे जास्त मिळाले तर आपल्याला हवेच असते. 

आपल्याकडे परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मसन्मान या गोष्टीच कमी आहेत की काय म्हणून आपण आयुष्यभर पैसा पैसा करीत राहतो ?


जे शिक्षण शाळा कॉलेजात मिळत नाही, ते ज्ञान असे अनेक जण रोजच्या जगण्यातून आपल्याला शिकवून जातात, *बस्स् आवश्यक असते ती पारखी नजर और कुछ अच्छा सिखने का जिगर !*


अशा लोकांपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. मी त्याच्या बोलण्याचा प्रतिवाद करूच शकलो नाही. फक्त त्याला माझ्या बरोबर चहा घे म्हणालो.


पण त्याने नम्रपणे नकार दिला, एवढेच म्हणाला की, अजून तीन चार ठिकाणी पाण्याची गळती थांबविण्यासाठी जायचे आहे. पाणी वाया जाणे हे माझे मलाच पटत नाही, खरं तर त्यामुळेच कंपनीतून फिटर म्हणून रिटायर्ड झाल्यावर मी हा व्यवसाय सुरू केला आहे आणि नवीन फिटींगपेक्षा गळतीची जुनी कामेच मी जास्त घेतो.


एवढं बोलून तो निघून गेला आणि मी मात्र बराच वेळ त्याच्या बोलण्याचा विचार करत होतो.


एक वेगळा अनुभव, ह्या आठवड्यातील *स्वातंत्र्य* *मनाचे* *अन* *स्वार्थातून* *मुक्ती* , मंथनातून सत्य शोधण्यासाठी.


🙏🏻🙏🏻